अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंग्युचा ताप वाढला आहे. नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याभागात तातडीने उपाय योजना हाती घेतल्या आहेत.
तसेच पावसाळा सुरू असल्याने डासांचाही उपद्रव नगर शहरात वाढला आहे.कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर नियंत्रणात आली होती, परंतु, पुन्हा एकदा रूग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे.
पाऊस होत असल्याने शहरातील विविध भागात डबकी साचली असून तुंबलेल्या गटारीतही डासअळ्यांची निर्मिती होत आहे. त्यामुळे मलेरियाचा धोका आहेच, तसेच स्वच्छ पाण्यातही डासअळी निर्मिती होऊन डेंग्युचा धोका वाढला आहे.
डेंग्युचा संसर्ग विषाणू बाधित एडिस एजिप्ती डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानवापासून डास व पुन्हा डासापासून मानव असा होतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यानुसार ज्या भागात रूग्ण आढळून आले, त्या भागात फवारणी करून सर्वेक्षण करण्यात आले.
परंतु, डेंग्युच्या डासअळ्या आढळून आल्या नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. तथापि, डेंग्यु रूग्ण आढळलेल्या परिसरात अॅबेट औषध टाकण्यात आले आहे. तसेच रूग्णांच्या घरातील सदस्यांचेही सॅम्पल तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत.
डेंग्युची रूग्णसंख्या आटाेक्यात आणून ती रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. याप्रकरणी आयुक्त शंकर गोरे यांनी लक्ष घातले असून त्याचा आढावा घेणार आहेत.