अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- फौजदारी खटला रद्द करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ न्यायालयातील महिला न्यायाधीशांना लाचलुचपत विभागाने गुरुवारी दुपारी अटक केली.
न्याय व्यवस्थाच भ्रष्ट झाल्यावर न्यायालयात सर्वसामान्य गरीब जनतेस न्याय मिळणार की नाही याची चिंता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
न्यायाधीशच पैसे घेऊन निकाल बदलत असतील तर नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेविषयी विश्वास राहिला का असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर पुढे आले आहेत.
अर्चना दीपक जतकर असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव यांना अटक केली होती.
लाच घेताना प्रथम खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती.
त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीशाचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार गुरुवारी एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकरला अटक केली आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस नाईक नवनाथ माळी, कर्मचारी सुप्रिया कादबाने, पूजा पागिरे, अविनाश इंगुळकर यांच्या पथकाने केली.