केवळ पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून रस्ते, वीज, पाणी याबाबत मतदार संघाचा विकास होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करीत आहे व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे.

त्या पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली असून हि मंजुरी आरोग्य मंत्रालयाने कोणी पाठपुरावा कोणत्या साली केला

हे आरोग्य मंत्रालयाच्या त्या मंजुरी पत्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्यामुळे जर का कोणी म्हणत असेल मी पत्र दिल्यामुळे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय झाले तर ते संपूर्ण चुकीचे आहे. नुसतेच पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो अशी बोचरी टीका आमदार आशुतोष काळे यांनी माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत सन २०२१-२२ च्या ७० लक्ष निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या ५० ऑक्सिजन बेडच्या कोविड वॉर्डचे (कोविड रूग्णांसाठी अतिरिक्त स्वतंत्र व्यवस्था) भूमिपूजन मंगळवार (दि.२९) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. ३० बेडच्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होवून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

केलेल्या पाठपुराव्यातून व अथक प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र श्रेय घेण्यासाठी माजी आ. कोल्हे उपजिल्हा रुग्णालय माझ्या पत्रामुळे झाल्याचे टिमकी वाजवत आहेत. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित पत्रकारांना आरोग्य मंत्रालयाचे मंजुरी पत्र दाखविले.

कोपरगावचे लोकप्रतिनिधी यांनी ३०/०९/२०२० रोजी दिलेल्या प्रस्तावाच्या मागणीनुसार कोपरगाव ग्रामीण रुग्णालय ३० खाटावरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता असा स्पष्ट उल्लेख असल्याचे उपस्थितीत पत्रकारांच्या निदर्शनास आणून देवून दुध का दुध आणि पाणी का पाणी करून कोल्हेंचे श्रेय घेण्याचे मनसुबे उधळून लावले.

यावेळी बोलतांना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी देखील माजी आ. कोल्हे यांच्या श्रेय घेण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. मी सुद्धा १० वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते, महाराष्ट्राचं कल्याण करा त्यामुळे १० वर्षापासुन आजपर्यंत महाराष्ट्राचं जेवढ कल्याण झालं तेवढ माझ्या पत्रामुळेच झालं असं म्हणायचं का असा सवाल माजी आ. कोल्हे यांना केला.

मागील निवडणुकीच्या तोंडावर निळवंडेच गाजर जनतेला दाखवलं मात्र गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता असतांना ५ नंबर साठवण तलावासाठी तुम्ही काही करू शकला नाही. याउलट आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवारांच्या मदतीने पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले.

जनतेचे कामे करण्यासाठी जनता संधी देते श्रेय वादाच्या लढाईत विकासकामे रेंगाळू नये हि नागरिकांची प्रामाणिक इच्छा असते. मात्र शहरातील हजारो लोकांना फायदा होणारे बहुचर्चित २८ विकासकामे होऊन मला व आमदार आशुतोष काळे यांना श्रेय जावू नये यासाठी या विकासकामांना विरोध करण्याचे पाप कोल्हे गटाचे नगरसेवक करत असल्याचे ते म्हणाले. पावसाळा सुरु होइपर्यंत कामे होवू द्यायची नाही

त्यानंतर निवडणुका आल्या की काही पाकीटवाले पुन्हा विचारायला मोकळे काय विकासकामे केली. मागील दीड वर्षापासून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर व तालुक्यात वेगाने विकासकामे होण्यासाठी आपल्या पदाचा वापर योग्य पद्धतीने केल्यामुळे मतदार संघाची विकासाकडे वाटचाल सुरु असून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देखील आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच मिळाली असल्याचे सांगितले.

कोल्हेंनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले आणि त्या आंदोलनात माझ्यावर आणि आ. आशुतोष काळे यांच्यावर टीका केली. तुमचे आंदोलन ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होते की आमच्यावर टीका करण्यासाठी होते याचा त्यांनी खुलासा करावा. आमदार आशुतोष काळे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

ते टीका करीत नाही ते काम करतात म्हणून दीडच वर्षात कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. मात्र मी आरे ला कारे करणारा असून तुम्ही ज्या ज्या वेळी बोलणार त्या त्यावेळी तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा वहाडणे यांनी कोल्हे यांना यावेळी दिला.

याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे,

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, अशोक आव्हाटे,

बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, इम्तियाज अत्तार, नारायण लांडगे, वाल्मीक लहिरे, संदीप कपिले, जावेदभाई शेख, धनंजय कहार, मनोज कडू, डॉ. आतिष काळे, प्रशांत वाबळे, डॉ. दिपक पगारे, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. कुणाल घायतडकर, चंद्रशेखर म्हस्के, गणेश लकारे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, ठका लासुरे, राजेंद्र जोशी, एकनाथ गंगूले, योगेश वाणी, विजय त्रिभुवन, शुभम लासुरे, नितीन शिंदे, राकेश शहा, लक्ष्मण सताळे, किरण बागुल, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24