अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील 33 के व्ही क्षमतेच्या सबस्टेशनच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.
तसेच यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील 2 महिन्यात पूर्ण करून सदर कामाची सुरुवात झाल्यानंतर काम 1 वर्षात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन तनपुरे यांनी दिले. नेवासा तालुक्यातील विजेच्या अडीअडचणी संदर्भात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
मंत्रालयात ना शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. नेवासा तालुक्यातील सोनई जवळील धनगरवाडी येथील 33 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन मंजूर असून या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झाल्यानंतर या सबस्टेशनचे कामही लवकरात लवकर हाती घेतले जाईल.
त्याचबरोबर तालुक्यातील तामसवाडी, खुपटी, रांजणगाव देवी, प्रवरासंगम या ठिकाणीही 31 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन प्रस्तावित आहे. या सबस्टेशनला शासनस्तरावर निधीची उपलब्धता झाल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल.
तसेच प्रवरासंगम व आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी बऱ्याच वर्षांपासूनची प्रवरासंगम येथे 33 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन व्हावे अशी मागणी होती त्यावर बैठकीत चर्चा होऊन सदर ठिकाणचा तात्काळ सर्व्हे करण्यात येऊन प्रस्ताव संबधित विभागास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच शेतीपंपासाठी कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत वीज कनेक्शन देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. या व इतर प्रश्नांवर चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.