अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- थकीत पगार न मिळाल्याने सुमारे 250 कामगारांनी राहुरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना मेन गेटवर जमा होत आंदोलन करून ठिय्या दिला.
तसेच साखर कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांना सर्वांनी हात वर करून पदावरून दूर करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. साखर कामगार सोसायटीचे माजी चेअरमन इंद्रभान पेरणे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही कामधेनू सुरू रहावी, सुरळीत चालावी, यासाठी संचालक मंडळास सहकार्य करत आलो आहे.
मात्र, व्यवस्थापनाने कामगारांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी अनेकवेळा मदत केली. मात्र, संचालक मंडळाने आमच्या पदरात काहीच टाकले नाही. प्रत्येकवेळी कामगारांनीच त्याग करायचा का? कामगार उपाशी पोटी राहून सहकार्य करतात, याची जाणीव राहिलेली नाही.
कामगार वसाहत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात आहे, याला कोणी वाली आहे की नाही? आता कामगारांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत कायदेशीर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या निर्णयाला सर्व कामगारांनी हात वर करून संमती दिली.