अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्याने मृतांचा 1 लाखांचा टप्पा पार केला. यातील 50 % मृत्यू हे केवळ मागील तीन महिन्यात नोंदवण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यू अधिक झाले असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय मॄत्युदर ही वाढला असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी मृत्यू मात्र वाढत असल्याचे दिसते. राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1 लाख 06 हजार 367 वर पोहोचला आहे. यातील 57 हजार मृत्यू हे दुसऱ्या लाटेत मागील तीन महिन्यात झाले असल्याचे समोर आले आहे.
राज्यात पहिल्या लाटेत 19 लाख कोरोना बाधित रुग्ण होते. त्यात साधारणता 49 हजार रुग्णांचे मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. दुसऱ्या लाटेत केवळ तीन महिन्यात 40 लाख लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाली.
त्यात साधारणता 57 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आज ही 16 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1600 रुग्ण आयसीयू मध्ये तर 1 हजार रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी रुग्ण संख्या कमी झाली नाही. दररोज 500 ते 800 च्या दरम्यान नवे रुग्ण सापडत आहेत.
यामुळेच मुंबई सारख्या शहरात सरासरी 25 च्या आसपास रुग्ण दगावतात. हीच परीस्थिती राज्यातील इतर शहरांमध्ये आहे. राज्यात दररोज सरासरी 400 ते 450 रुग्ण दगावतात. याशिवाय दररोज 1500 जुन्या रुग्णांची नोंद केली जाते.
त्यामुळे राज्यातील मृत्युदरात वाढ झाली असून महिन्याभरापूर्वी 1.49 असलेला मृत्युदर 1.81 % वर पोचला आहे. पुढील महिनाभर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मृत्युदर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.