अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थांनच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला हि खुर्ची मिळणार याकडे सध्या नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एक महत्वपूर्ण मागणी समोर आली आहे.
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी पक्षाचेे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात कोते यांनी म्हटले आहे की, शिर्डी साईबाबांची कर्मभूमी आहे. त्याच साईबाबांवर श्रद्धा असलेले लाखो करोडो भक्त आज जगाच्या कानाकोपर्यात आहेत. आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहे.
सरकारच्या अधिकारात येणार्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देखील भाविक आणि जनतेच्या हिताचे काम व्हावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत त्यात महाविकास आघाडीत देखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत जामखेडचे आ .रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची दूरदृष्टी साधून राज्यभरात नावलौकिक प्राप्त केला असल्याने अशा कर्तृत्ववान युवा नेत्याची या अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रोहित पवार यांच्याकडे साईबाबा संस्थानची सुत्रे द्यावीत त्यातून साईभक्त आणि परिसराचा नक्कीच विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.