अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे असे सांगत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रूग्ण तसेच लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या नागरीकांसाठी आहोरोत्र झटणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आपल्या इनिंगला सुरूवात केली आहे.
गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आ. लंके यांनी सुरूवातीस नागरीकांना प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर विविध शासकिय अधिकाऱ्यांकडून कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेत राज्य पातळीवरून मतदारसंघासाठी काही मदत आवश्यक आहे का याचीही त्यांनी चाचपणी केली. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन सरकारी तसेच खाजगी रूग्णालयात कोरोना बाधित उपचार घेऊ लागले असून आ. लंके यांनी सुपे येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची शुक्रवारी रात्री भेट घेतली.
सामान्य रूग्णांपेक्षा अधिक त्रास होत असलेल्या, श्वसनाचा त्रास होत असलेल्या रूग्णांची आ. लंके यांनी थेट त्यांच्या बेडजवळ जाऊन भेट घेतली. देशभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचा नागरीकांची चांगलाच धसका घेतला आहे.
कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी न घेणारे नागरीक कोरोनाची बाधा झाल्यानंतर मात्र देवाचा धावा करतात.
मात्र अशाच रूग्णांना दिलासा देण्यासाठी आ. लंके यांनी या रूग्णांची भेट घेत, त्यांच्यासमवेत सेल्फी काढीत, त्यांना एखादे फळ खाण्याचा आग्रह धरीत दिलासा देण्याचे काम केले आहे.सोशल मिडीयावर हे चित्र चांगलेच व्हायरल होत आहे.