अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कुकडीचे शेती सिंचन आवर्तन चालू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कुकडीच्या अधिकारी कर्मचारी यांनी संगनमत करुन किलोमीटर १३२ वरील जोड कालवा श्रीगोंदा शिवारात कालवा फोडून एका तलावात पाणी सोडण्याचा अजबपणा केला आहे.
या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही तर अधिवेशन काळामध्ये मंत्रालयासमोर सोमवार नंतर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र काकडे यांनी दिला आहे. लोणीव्यंकनाथ, घारगाव , पारगाव , श्रीगोंदा , बाबुर्डी , शिरसगाव , म्हातारपिंप्री शिवारातील शेतकरी कुकडीच्या पाण्याची अतुरतेने वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांना थेट पाणी न देता तलावात पाणी सोडण्याचे उद्योग चालू आहेत. कुकडीचे हे फक्त शेती सिंचनासाठी आहे. कोणत्याही तलावात पाणी सोडू नये असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.
तसेच काकडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी संगनमताने पाणी विकत असल्याचा आरोप देखील काकडे यांनी केला आहे. कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता
१३२ चारी ही लिंपणगाव येथील पाणीवापर संस्थेच्या लोकांनी फोडली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप बिनबुडाचा आहे तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे भरणे करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे काळे यांनी सांगितले.