‘या’ ग्रामीण आरोग्य केंद्राला ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन मिळणार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा व मतदार संघातील राहाता तालुक्यातील इतर गावातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी गरज पडल्यास १० ऑक्सिजन बेडची सुविधा करून देणार असल्याची ग्वाही देवून पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२४) रोजी पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची केलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनाला येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांचे मालक व त्यांचे कर्मचारी यांची कोविड तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तपासणीचा वेग वाढवा. कोरोना संसर्ग वाढणार नाही यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घ्यावा.

नागरिकांचे प्रबोधन करून बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यासाठी कोरोना समितीच्या सदस्यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या व आपल्या कुटुंबाचे आरोग्य आबाधित ठेवावे असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी सरपंच अँड मुरलीधर थोरात, शांतीलाल भाटी, अरुण बाबरे, संजय धनवटे, सचिन धोर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड, डॉ. मुर्तडक, ग्रामविकास अधिकारी कडलग आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24