राज्यातील मेंढपाळांसाठी यशवंतराव होळकर महामेष योजना कायम

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी – राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

या योजनेमुळे मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि धनगर व तत्सम समाजाला आर्थिक बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१७ साली सुरू झालेल्या या योजनेची फलश्रुती लक्षात घेता तिची व्याप्ती वाढवून अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा आणि भटक्या प्रवर्गातील समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, या उद्देशाने पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास काही बदलासह मंजुरी देण्यात आली.

या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या २९ कोटी ५५ लाख निधीला खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि पुढे ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार चालू ठेवण्यात येईल.

पशुधन खरेदीच्या बाबतीत ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसांत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थींना देण्यात येईल. चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील, असे पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

ही योजना केवळ भटक्या जमातीतील प्रवर्गासाठी लागू असणार आहे. योजनेत ६ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज MAHAMESH हे अॅप www.mahamesh.in या संकेतस्थळावरून अथवा गुगल प्ले मधून डाउनलोड करून करता येणार आहेत.

Ahmednagarlive24 Office