अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा प्रसिद्ध आहे.
नगर व पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील भाविकांच्या उपस्थितीने व्यापक स्वरूपात हा यात्रोत्सव, कुस्त्यांचे फड येथे रंगतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा भरवता येत नसल्याचे दिसून येत आहे.
यामुळे गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जातेगाव, आपधूप, पिंप्री गवळी, रायतळे, अस्तगाव या गावातही त्यांच्या ग्रामदैवतांचा यात्रोत्सव असला
तरी कोरोनामुळे या यात्रा जत्रा गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी लॉकडाऊनच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. साहजिकच या उत्सवाचे आयोजन नियोजन व कार्यवाही करणाऱ्या गावकरभाऱ्यांच्या उत्साहावर त्यामुळे पाणी फिरले आहे.
कोरोनाच्या पुनरागमनाने व त्यातील दुर्घटना, इंजेक्शन मिळत नाही. कुठे बेड नाही तर काही ठिकाणी ऑक्सिजन नसल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवघेण्या धावपळीच्या बातम्यांनी जीव कासावीस होत असल्याने
‘नको रे बाबा’ ही महामारी त्यासाठी यात्रा बंदी केलेली बरी असे गावच्या कारभारी मंडळीमधून बोलले जात आहे.
दरम्यान दोन वर्षांपासून यात्रा, त्यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, शोभेचे दारूकाम, मिठाईची दुकाने, खेळणी, घरगुती व शेतीकामाच्या छोट्या-मोठ्या वस्तूची खरेदी-विक्री बंद झाली व पर्यायाने छोटे-मोठे व्यावसायिक यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.