अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा सुरु असलेला प्रक्रियेवर एक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. रेल्वे मालधक्का इतरत्र न हलविता नगर येथील रेल्वे स्टेशन येथे कामकाज सुरू करण्याचा निर्णय वाहतूकदार व माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच न्यायालयाचा निर्णय दोघांनाही मान्य राहील, असे यावेळी ठरले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर येथील मालधक्क्यावर संप सुरू असल्याचे
कारण पुढे करत प्रशासनाने मालधक्का विळद येथे हलविण्याची कार्यवाही सुरू केली होती; मात्र आमदार संग्राम जगताप यांनी त्यास विरोध केला. जगताप म्हणाले, रेल्वे स्टेशन वरील मालधक्का हा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान जगतापांनी मालधक्का इतरत्र न करण्याची भूमिका घेतली.
त्यांनी ठेकेदार व माथाडी कामगारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. अखेर मंगळवारी यावर तोडगा निघाला. वाहतूकदार व माथाडी कामगार यांनी समन्वयाने काम करण्याचे ठरले.
दरवाढीबाबत न्यायालयाचा जो निर्णय होईल, तो दोघांनाही मान्य राहील, अशी कबुली ठेकेदार व माथाडी कामगारांनी दिली आहे. हमाल माथाडी कामगार संघटनेचे नेते अविनाश घुले म्हणाले की, आमदार जगताप यांनी मध्यस्थी केल्याने मालधक्का नगरमध्येच राहिला असून, कामगारांची होणारी उपासमार टळली आहे.