अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आपला आवाज फक्त बीड आणि मुंबई पुरता नाहीतर आता दिल्लीत घुमवायचा आहे. पंकजा मुंडे यांचे प्रेमळ रूप तुम्ही पाहिले आहे.
आता दुर्गेचे रूप दिसणार आहे, अशी घोषणा खासदार प्रीतम मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केली. आज भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दसरा मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
पंकजा मुंडे यांच्या आधी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या, तुम्ही उन्हात बसला आहात. हे तुमचे प्रेम आहे. आता आपण मागे हटायचे नाही. दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवायचाय. आतापासून कामाला लागले पाहिजे. आपल्या भाषणात प्रितम मुंडे म्हणतात की, लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही.
आपला आवाज फक्त बीड जिल्हा किंवा मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहोचतो. सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार व्यक्त करते. आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही?
किती मोठी होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडून बघा. रसाळलेला जनसमुदाय बघा. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक आहे.
त्या पुढे म्हणतात, आज दसऱ्याचा दिवस आहे, विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो.
पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायाळू, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता,
अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे. त्यामुळे मी आज सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतेय.