लासलगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (Bjp) व नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना इशारा दिला आहे.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती न करता शिवसेनेने निवडणूक लढली. केंद्र आणि महाराष्ट्र वगळता देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री असतानाही मुंबईचा (Mumbai) महापौर शिवसेनेचा होता. मुंबई महानगरपालिकेसाठी चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी. तुम्हीही पैलवान आहात, आम्ही ही पैलावान आहोत, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
तसेच यापूर्वीच्या भाजप व शिवसेना (Shivsena) युतीबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, शिवाय शिवसेना पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते, तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच मी एका शेतकरी कुटुंबातील आहे. आमदार होईल, असे स्वप्न बघितले नव्हते. कुटुंबातील कोणी साधे ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. १९८२ साली मी पानटपरी आणि व्हिडिओ चालक होतो. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मंत्री पदापर्यंत पोहोचले, असा उल्लेख यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.