अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या गोंधवणी – भैरवनाथनगर ग्रामपंचायत शिवारात असलेल्या सम्राट नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाच्या वडीलांचे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या वडीलांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्या तरुणाने त्याच्या वडिलांचा दफनविधी घरासमोरच करण्याचे ठरवले. ही बाब आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना समजली त्यामुळे या भागातील रहिवाशांनी घरासमोर दफनविधी करण्यास आक्षेप घेतला.
त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होऊ नये या कारणाने भैरवनाथ नगर ग्रामपंचायत चे सरपंच श्री.भरत तुपे यांनी ही बाब तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कोरोना काळ चालू असल्याने त्या बाबतच्या नियमांची माहिती त्या तरूणास सांगितली.
त्या तरुणाला देखील प्रशासनाचे आणि ग्रामस्थांचे म्हणणे पटल्याने त्या तरुणाने वडिलांचा दफनविधी घरासमोर करण्याचे थांबवले आणि त्याने त्याच्या वडिलांचा दफनविधी श्रीरामपूर कब्रस्तान येथे केला.
भैरवनाथनगर चे सरपंच, ग्रामस्थ आणि वडील मयत झालेल्या त्या तरुणाचा समजूतदारपणा तसेच प्रशासनाने दाखवलेली तत्परता यामुळे या प्रकरणावर लगेच पडदा पडला.
श्रीरामपूरचे तहसीलदार श्री.पाटील व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पोलीस कर्मचारी व प्रशासनाला घटनास्थळी पाठवून अतिशय संवेदनशील पणे हे प्रकरण हाताळले.