युवकांनो, तुम्ही अशा भानगडीत पडूच नका, ‘या’ पोलीस निरीक्षकांनी केले भावनिक आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- ‘प्रेम आणि ‘शारिरीक आकर्षण’ यात वाहत चाललेल्या युवा वर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. प्रसंगी युवक टोकाची भूमिका घेत आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करताना दिसत आहेत.ज्या वयात या अनावश्यक बाबींना फाटा देत आपले ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी प्रेम व शारीरिक अकर्षणात गुरफटून जात आहे.

मित्रांच्या नादाने अथवा सोशल मिडियावर अल्पवयीन मुलींना पाहून प्रपोज करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, वारंवार त्रास देणे,सतत पाठलाग करणे,सोशल मिडियावर नाहक त्रास देणे,छेड काढणे या बेकायदेशीर गोष्टी करतात. खूप मुली सदरचा प्रकार आई-वडील अथवा जवळचे नातेवाईक यांना सांगतात.

खूप वेळा सदरचे प्रकरण पोलीस ठाण्यात येते. मुलांना कडाडून विरोध होतो. मुलगा असं करतोय याबाबत चर्चा होते. त्यामुळे मुलाची आणि त्याच्या आई-वडिलांची आणि कुटुंबाची बदनामी होते. तेंव्हा आपण केलेल्या चुकांची आपल्याला शिक्षा मिळणार प्रसंगी आपल्यावर गुन्हे दाखल होणार, आपली समाजात असलेली प्रतिष्ठा धुळीस मिळणार याची खात्री होताच अनेक युवक आत्महत्त्यासारखे पर्याय अवलंबतात.

मात्र स्वतःचे व कुटुंबाचे विनाकारण नुकसान करू नका’ असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. बेकायदेशीर गोष्टींमध्ये आपले सुख शोधत अनेक युवक आपल्या जीवितास मुकतात.कुटुंबाची जबाबदारी,आपले आई-वडील,आपले भविष्य,शिक्षण याचा कसलाही विचार न करता बेकायदेशीर मार्ग अवलंबतात.मुळात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी मुलांनी सतर्क राहायला हवे.

ज्या गोष्टींतुन आपले नुकसान होणार आहे मुळात ती गोष्ट करूच नये.आपल्या आई-बहिणी सुरक्षित राहाव्यात त्यांना कुणाचाही त्रास होऊ नये,मुलींना निर्भयपणे शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी कर्जत पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे. शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी जाऊन त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे.

मुलींची पोलीस स्टेशनला सहल काढून पोलिसांच्या विषयीची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला. मोकळ्या मनाने मुली आणि महिला आपली तक्रार कर्जत पोलिसांपुढे मांडत आहेत. महिला-मुलींची छेड काढणाऱ्या अनेक मजणूंना कायद्याचा धाक दाखवत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

अल्पवयीन मुलींची छेड काढल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणारच आहेत.अज्ञान मुलींना आपल्या पालकांच्या मर्जीशिवाय कोणताही निर्णय घेता येत नाही,अशा वेळी मित्रांच्या सांगण्यावरून,आकर्षणातून छेडछाडीच्या घटना घडतात आणि यात मुलांचे शैक्षणिक सामाजिक मोठे नुकसान होते आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर कायदा खूप कडक आहे,अनेक गुन्हे दाखल होतात.

ज्या गोष्टींसाठी भविष्यात वेळ आहे ती गोष्ट करण्यासाठी युवा पिढी आपला वेळ,पैसा आणि जीवनाचा महत्वाचा टप्पा दावणीला लावत आहे. हे विशेष. ‘आत्महत्त्यासारखे पाऊल उचलून क्षुल्लक बाबींसाठी आपल्या कुटुंबाची कुणीही वाताहत करू नये. मागील काही दिवसात कर्जत तालुक्यात अशा घटना घडलेल्या आहेत. आयुष्य चांगले जगा.बेकायदेशीर गोष्टी टाळा असेही आवाहन यादव यांनी केले आहे.

‘ज्या वयात आपले ध्येय पुर्ण करण्याची स्वप्ने पाहणे आवश्यक आहे त्या वयात प्रेम,आकर्षण या बाबींकडे युवा पिढी वळली जाते.आपल्या हातून चुकीची तर गोष्ट घडत नाही ना?याचे आकलन अनेकांना होत नाही. आणि जेंव्हा चुक मान्य होते तेंव्हा वेळ गेलेली असते. गुन्हे दाखल होतात.

समाजातील प्रतिष्ठा खालावते आणि टोकाची भूमिका घेऊन आत्महत्यासारख्या घटना घडतात.त्यामुळे भावनांना आवर घाला, आपले मित्र कोण आहेत हे एकदा तपासा. अशा बेकायदेशीर गोष्टींपासुन दूर रहा, आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना त्याबाबत शिक्षण दिले पाहिजे. असे आवाहन कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.