डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; वडील गंभीर मात्र पोलिसांना डंपर मालक,चालकाचा शोध नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्थानिक वृत्त वाहिनीत निवेदिका असलेल्या संपदा सुरेश साळवे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यात तिचे वडील गंभीर जखमी झाले.

ही घटना कान्हूर पठार घाटात घडली. संपदा साळवे व तिचे वडील सुरेश साळवे टाकळी ढोकेश्वर येथून कान्हूर पठार येथे घरी परतत होते.कान्हूर पठार घाटाच्या सुरुवातीच्या वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने (एमएच १६ सीए ७२९७) साळवे यांच्या दुचाकीला (एमएच १६ बीआर ६१७८) धडक दिली.

यामुळे संपदा व तिचे वडील रस्त्यावर फेकले गेले.त्यात संपदाचा जागीच मृत्यू झालातर सुरेश साळवे गंभीर जखमी झाले.त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

अपघात घडला त्यावेळी पारनेर पोलिसांचे पथक तहसीलदार ज्योती देवरे यांच्या समवेत टाकळी ढोकेश्वर परिसरात गस्त घालत होते. अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, उपनिरीक्षक हनुमंत उगले, सहायक उपनिरीक्षक अशोक रोकडे घटनास्थळी आले. त्यांनी जखमीला खासगी वाहनातून उपचारासाठी हलवले.

अपघातानंतर डंपर चालक पळून गेला. मृत संपदाचे चुलते शशिकांत साळवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर सहा तासांनी पारनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डंपरचा क्रमांक माहिती असतानाही पोलिसांना डंपर मालक,चालकाचा शोध घेता आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24