आपली सुरक्षा, आपल्या हाती जनजागृती मोहिम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाची तीसरी लाट येऊ नये व कायद्याचे राज्य ही संकल्पना मोडीत निघू नये, यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर आपली सुरक्षा, आपल्या हाती ही जनजागृती मोहिम सुरु केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कोरोनामुळे गेली अठरा महिने राज्यातील जिल्हा न्यायालयांचे कामकाज ठप्प होते. नुकतेच जिल्हा न्यायालयांचे कामकाज 15 जून पासून सुरु झाले आहे.

जिल्हा न्यायालयांचे कोरोना काळात काळजी घेऊन व वर्चुअल पध्दतीने चालवली जाऊ शकत होती. मात्र न्यायालये बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अनागोंदी निर्माण झाली. जागा बळकावणे, अनाधिकृत बांधकामे असे प्रकार सर्रास सुरु होते.

अशा परिस्थितीमध्ये या संघटनांनी न्यायालयाचा पंचनाम करुन सत्यबोधी आंदोलन करण्याचे धाडस दाखविले. आंदोलनाचा इशारा व केलेल्या पाठपुराव्याने जिल्हा न्यायालयांचे कामकाज सुरु झाले आहे. जाब विचारणारे पुढे आल्यास कर्तव्याची जाणीव लोकसेवकांना होत असते. अन्यथा आपण कोणाला जबाबदार नाही, कोणी लक्ष देत नसल्याचा संभ्रम न्याय व्यवस्थेला झाला होता.

भारतीय संविधानामध्ये आंम्ही भारतीय म्हणजेच भारतीयांचा सामुदायिक विवेकाचा विचार घटनेच्या मुलतत्त्वात करण्यात आला आहे. जनतेच्या सारासार विवेकापेक्षा कोणी मोठा नाही. उन्नतचेतनेतून कायद्याची निर्मिती होते.

कायदा उन्नतचेतनेच्या माध्यमातून राबविला पाहिजे. तरच न्याय झाल्याचे समाधान मिळते. अन्यथा न्यायालये असून, न्याय होत नसेल तर कायद्याची अंमलबजावणी कृष्णवीवरात जाऊन अनागोंदी व यादवी निर्माण होईल. याचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेऊन कोरोना काळात कर्तव्य बजावले. या धर्तीवर जिल्हा न्यायालयांचे कामकाज चालणे अपेक्षित होते. तीसरी लाट येऊ नये व न्यायालयाचे कामकाज पुन्हा बंद होऊ नये यासाठी नागरिकांनीच काळजी घेऊन कोरोना संक्रमण रोखण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

आपली सुरक्षा, आपल्या हाती या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24