अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात धक्कादायक घटना घडली आहे महापारेषणचा पोल अंगावर पडल्याने आनंद प्रभाकर हुलगुंडे वय २५ वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला यामुळे चुंबळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
जामखेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील शिवारातून जाणारी महापारेषणची टाॅवर विद्युत वाहिनी आहे. आष्टी १३२ केव्ही ते खर्डा १३२ केव्ही जोडणारी वीज वाहिनी आनंद हुलगुंडे यांच्या शेतातून जाते. मात्र महापारेषणने हुलगुंडे यांना ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आमच्या शेतात तो टाॅवर नको, असे हुलगुंडे म्हणत होते. रात्रीच्या वेळी दोन ते अडीचच्या आसपास टाॅवरमधील काही खांब हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्यावर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.
महावितरण अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले कि, आष्टी ते खर्डा उच्चदाब लाईन चुंबळी येथून जाते. प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचं नुकसान म्हणून तीन लाख सहा हजार रुपये चेकद्वारे देण्यात आले आहेत. याठिकाणी कामही पूर्ण झाले आहे. परंतु, रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टॉवरचे सपोर्ट कापले.
त्यामुळे टॉवर एका बाजूला कलला आणि तो त्याच्या अंगावर पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. धक्कादायक माहिती… याप्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंद याच्या मृत्यू झाल्यानंतर तो रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कशासाठी गेला होता.
हे समजू शकले नाही. तर शेतात टॉवर उभारण्यासाठी या शेतकऱ्याने विरोध केला होता. शेतात उभारण्यात आलेले टॉवर पाडण्यासाठी तो रात्री शेतात गेल्याचा दावा महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.