पूरग्रस्तांसाठी युवान मार्फत ‘युवा सेवा शिबीर’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- पूरग्रस्त भागात दीर्घकालीन सेवा कार्याची गरज लक्षात घेऊन ‘युवान’ मार्फत ८ दिवसीय विशेष ‘युवा सेवा शिबिराचे’ येत्या ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान शिरोळ जि. कोल्हापूर आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, ता. मणगांव जि. रायगड येथे आयोजन करण्यात आले आहे.

विविध महाविद्यालयातील १०० निवडक, समर्पीत स्वयंसेवक तेथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य हाती घेणार आहेत. आय लव्ह नगरचा विशेष सहयोग शिबिरास आणि तेथील मदत कार्यास असणार आहे.

सेवा शिबिरामार्फत तेथील जवळपासच्या पूरग्रस्त ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा स्वच्छता, दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांना निरंजन सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा सहयोग देखील देण्यात येणार आहे. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात पर्यावरणाविषयी जनजागृतीही केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना शिबिरासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड या जिल्ह्यात आणि कोकणात आलेल्या महापूर, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील आपले मराठी बांधव आणखी संकटात सापडले आहेत .

‘युवानने’ पुरग्रस्तांची तातडीची गरज लक्षात घेऊन हेरवाड ता. शिरोळ, जि. कोल्हापूर आणि अतिवृष्टी, भूस्खलनग्रस्त गोजेगाव खुडूपले, ता. पाटण जि. सातारा येथे ‘सेवा किचन’ सुरु करून पूरग्रस्तांना अन्नाचा आधार दिला.

यापूर्वीही चेन्नई केरळ आणि दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगली येथे युवान स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना मोठा आधार दिला आहे शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींनी आणि पूरग्रस्तांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी ९०११११८७८७ / ९८९०४८६५१० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन युवान मार्फत करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24