अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील लोणी येथील एरिगेशन बंगला परिसरात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
हत्येनंतर अवघ्या तीन तासांत कुठल्याही पुराव्याशिवाय लोणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही हत्या मृत तरुणाच्या दोन मित्रांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अर्जुन अनिल पवार (वय २०, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
शिवा ऊर्फ विठ्ठल कैलास काळे (वय २२) व दीपक विजय डोळस (वय २०, दोघे रा. राहुरी खुर्द) असे खूनप्रकरणी निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत राहाता तालुक्यातील लोणी एरिगेशन बंगला परिसरतील कॅनॉलजवळ मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती लोणी पोलिसांना समजली.
लोणी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी युवकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समयसूचकता दाखवत लोणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
यामध्ये मृत युवकाच्या दोन मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे समोर आल्याने दोन्ही आरोपींना राहुरी कारखाना ते देवळाली प्रवरा रस्त्यावर पाठलाग करून शिताफीने लोणी पोलिसांच्या पथकाने पकडले.
गोरख अशोक बर्डे (रा. राहुरी खुर्द) यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी,
पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी, सुरेश पवार, पोलिस नाईक दीपक रोकडे, सांगळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल संपत जयभाय, एस. आर. घोडे आदींनी केली.