अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनामुळे कर्ते वडील अथवा आई-वडील दोन्ही गमावणाऱ्या अनाथ तरुणांना युवान या सामाजिक संस्थेद्वारे स्वावलंबन योजना राबवून स्वबळावर उभे केले जाणार आहे.
या अंतर्गत १२ वी व १२ वी पासून पुढील शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन, सहाय्यद्वारे अनाथ तरुणांना स्वावलंबी बनविण्यात येईल. त्यासाठी नामांकित शैक्षणिक संस्था, खाजगी आणि उद्योग क्षेत्रालाही मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे
कोरोनाचा सर्वाधिक फटका कुटुंबातील कर्ता व्यक्ती अथवा आई- वडील दोन्ही गमावणाऱ्या मुलांना बसण्यास सुरवात झाली आहे. त्यांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. विशेषतः तरुणांसमोर पुढील उच्च शिक्षण आणि रोजगाराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सरकारने विविध मदत योजना घोषित केल्या असल्या तरी ती वेळेवर मदत न मिळाल्यास अथवा अंमलबजावणी मध्ये त्रुटी राहिल्यास अनेकांचे शिक्षण खंडित होण्याची मोठी शक्यता आहे. ही गरज ओळखून हा विशेष कोविड मदत प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने मानसिक आधार, निवास, भोजन, समुपदेशन,शैक्षणिक खर्च आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. ती सर्व समावेशक मदत ‘स्वावलंबन योजनेद्वारे’ मिळवून देण्याचा युवानचा प्रयत्न आहे.
गरजू तरुण विद्यार्थ्यांनी ९०२८१७८७८२ अथवा ९८३४०८७९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘युवान’ मार्फत करण्यात आले आहे. लोकसहभागातून ही योजना राबविणार असल्याने संवेदनशील नागरिकांनी यासाठी सढळ हाताने सहयोग द्यावा, असेही आवाहन युवान मार्फत करण्यात आले आहे.