अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व नागरिकांनी मागणी केल्यानंतर नगर तालुक्यातील चापेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुख्याध्यापकासह शिक्षिकेकडे स्थानिक नागरिकांनी शाळा सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. त्यानुसार चापेवाडी शाळा सुरू करण्यात आली आहे.
शाळा सुरू झाल्याने चिमुकल्यांनी जल्लोष करत शाळेमध्ये हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून चिमुकल्यांसाठी शाळेचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
त्यामुळे शाळा सुरू झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा भरविण्यात येत असल्याची
माहिती मुख्याध्यापक नवनाथ तोडमल यांनी दिली. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी तापमान तपासण्यात येत असल्याने पालकही आपल्या चिमुकल्यांना उत्साहात शाळेत पाठवत आहेत.