अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायतींना १५ वित्त आयोगाचा निधी थेट देण्याचा निर्णय घेतला असतांनाही जिल्हा परिषदेने नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा ३५ कोटींचा विकास निधी एक वर्षापासून थांबवून ठेवला आहे.

यामुळे विकास कामे खोळंबली आहे. आपल्या काही तांत्रिक व राजकीय आडमुठ्या धोरणामुळे केंद्र सरकारने एवढा मोठा निधी मंजूर करूनही स्थानिक पातळीवर कामे सुरू नाहीत.

येत्या १५ दिवसांत १५व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा जिल्हा परिषदेवर खासदार डॉ. सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, अथवा जिल्हा परिषदेच्या विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिला.

नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन देऊन चर्चा केली.

कर्डिले म्हणाले, ग्रामपंचायतीचा एक वर्षाचा १५ व्या वित्त आयोगाचा हक्काचा निधी पाणीपुरवठा, वीज बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेने वर्ग करण्याचा घाट घातला आहे.

ग्रामपंचायतीने गावच्या विकासाचा एक वर्षाचा विकास आराखडा तयार केला असून, जिल्हा परिषदेकडे आराखडा पाठविला असूनही अद्यापपर्यंत ग्रामपंचायतींना कुठलाही निधी उपलब्ध करून दिला नाही. असा आरोपी कर्डीले यांनी केला आहे.