Parle G Success Story : भारतात पारले हे नाव गेल्या 9 दशकांपेक्षा अधिक काळापासून प्रत्येक भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान तयार करून आहे. हे नाव कोणालाच अपरिचित नाही.
तुम्हीही पारले कंपनीचे प्रॉडक्ट नक्कीच चाखले असणार. पारले फक्त बिस्किट बनवते असे नाही तर ही कंपनी बिस्किट सोबतच टॉफी, केक, पाणी किंवा फ्रूटी किंवा अॅपीसारखे पेये देखील तयार करते. आपल्या प्रत्येकाच्या घरात पारलेच्या या प्रॉडक्ट पैकी एखाद-दुसरे प्रॉडक्ट नक्कीच सापडणार आहे.
पारले उत्पादनांची मूळ कंपनी ‘हाउस ऑफ पारले होती, जी 1928 मध्ये सुरू झाली. पण या कंपनीने मिठाई बनवण्याचा पहिला कारखाना 1929 मध्ये सुरू केला. तेव्हापासून कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ही कंपनी भारतासमवेतच संपूर्ण जगात आपले एक वेगळे स्थान ठेवते.
सुरुवातीला जी मूळ कंपनी सुरु झाली होती ती पुढे जाऊन तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली गेली. या कंपनीने सलग ४ वर्षे मोंडे निवड पुरस्कार मिळवला आहे. दरम्यान आज आपण आपल्या आजी-आजोबां अन पणजी-पणजोबापासून प्रसिद्ध असलेल्या या भारतीय खाद्य कंपनीची यशोगाथा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हाऊस ऑफ पारले कंपनी मोहनलाल दयाल चौहान यांनी 1928 मध्ये सुरू केली होती. असं सांगितलं जातं की चव्हाण यांच्यावर स्वदेशी चळवळीचा खूप प्रभाव होता. चौहान कुटुंबाचा आधी रेशीमचा व्यवसाय होता. पण नंतर मोहनलाल यांनी मिठाई व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
मोहनलाल हे मिठाई बनवण्याची कला शिकण्यासाठी जर्मनीलाही गेले होते, जेव्हा ते परतले तेव्हा त्यांच्याकडे आवश्यक यंत्रसामग्री देखील होती, जी त्यांनी आयात केली आणि त्यावेळी 60,000 रुपयांना ती संपूर्ण यंत्रसामग्री भारतात आणली.
मीडिया रिपोर्टनुसार मिठाई बनवण्याचा पारलेचा व्यवसाय 1929 मध्ये सुरू झाला. अवघ्या 12 लोकांसोबत या व्यवसायाची पायाभरणी झाली. मोहनलाल यांनी एक जुनी कंपनी खरेदी केली आणि तिथेच हा मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरू झाला. विशेष म्हणजे सुरुवातीला कंपनीत जे 12 लोक होते ते सर्व फॅमिली मेंबर होते.
मुंबईच्या विलेपार्ले मध्ये ही फॅक्टरी सुरू झाली. असे सांगितले जाते की या जागेच्या नावावरूनच या कंपनीला पारले नाव देण्यात आले. या कंपनीने मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिले प्रॉडक्ट ऑरेंज कॅन्डीचे बनवले. व्यवसाय सुरू झाल्यानंतर जवळपास आठ ते नऊ वर्षांनी या कंपनीने पहिल्यांदा बिस्किट निर्मिती केली.
मात्र बिस्किट बनवण्याची सुरुवात जरी उशिराने झाली असली तरी कंपनी खऱ्या अर्थाने बिस्कीट वरूनच ओळखली जाऊ लागली. पहिल्यांदा कंपनीने पारले ग्लुको हा बिस्कीट लॉन्च केला. हा बिस्किट जवळपास 12 वर्ष भारतात सर्वात जास्त विक्री होणारा बिस्किट म्हणून ओळखला जातो.
यानंतर हाच ग्लुको बिस्किट पारलेजी बिस्कीट म्हणून नावारूपाला आला. मीडिया रिपोर्ट नुसार 1985 च्या आसपास कंपनीने बिस्कीट चे नाव बदलले. तेव्हापासून हा बिस्किट पारले जी या नावाने ओळखला जात आहे. यानंतर 1941-45 च्या दरम्यान, कंपनीने पहिले सॉल्टेड क्रॅकर मोनॅको बिस्कीट लाँच केले.
1946-50 च्या दरम्यान, पारलेने भारतातील सर्वात उंच ओव्हन तयार केले. ते 250 फूट लांब होते. यानंतर, चीझी स्नॅक्स चीझलिंग्ज 1956 मध्ये लाँच करण्यात आली आणि किसमी 1963 मध्ये बाजारात आली. ही टॉफी आजही विकली जात आहे. यानंतर कंपनीने 1966 मध्ये पॉपिन्स आणले. त्यानंतर 1966-70 मध्ये पारले जेफ्स लाँच करण्यात आले.
मूळ पारले कंपनी आज तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली गेली आहे. पारले प्रॉडक्ट्स, पारले अॅग्रो आणि पारले बिसलेरी या तीन कंपन्यामध्ये मूळ कंपनी विभागली गेली आहेत. पण एक गोष्ट विशेष अशी की या तिन्ही कंपन्या आजही चौहान कुटुंबाच्या मालकीच्या आहेत.
बिस्लेरी, वेदिका, लिमोनाटा, फोनझो, सिप्सी, बिसलेरी सोडा इत्यादी पारले बिस्लेरीचे ब्रँड आहेत. Maza, Thums Up, Limca, Citra आणि Gold Spot हे देखील पारले बिसलरीचे पूर्वीचे ब्रँड होते. या ब्रँडला कोका कोलाने 1993 मध्ये विकत घेतलेले आहे. पारले बिसलेरी कंपनीचे नाव पूर्वी पारले ग्रुप असे होते.
तर अॅपी फिझ, बी फिझ, फ्रूटी, बॅलेट, स्मूथ इत्यादी पारले अॅग्रोचे ब्रँड आहेत. पारले प्रॉडक्टच्या उत्पादनांमध्ये पारले-जी, 20-20 कुकीज, क्रॅकजॅक, मोनॅको, हॅपी हॅप्पी, मिलानो पारले रस्क, हाईड अँड सिक, दूध शक्ती, झिंग, कच्चा मँगो बाइट, किस्मी, मेलडी इत्यादींचा समावेश आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचे भारताबाहेर कॅमेरून, नायजेरिया, घाना, इथिओपिया, केनिया, आयव्हरी कोस्ट, मेक्सिको आणि नेपाळमध्ये उत्पादन युनिट्स आहेत. सध्या, पारले प्रॉडक्ट 150 पेक्षा जास्त उत्पादन श्रेणी आहेत आणि कंपनी 21 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. पारले प्रॉडक्ट्सची उत्पादने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मध्यपूर्वेत विकली जात आहेत.