चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी !
मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !
मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी.
श्री गणेशाच्या मूर्तीसाठी मखर बनवतांना थर्मोकोलचा वापर करू नये. थर्मोकोल हा अविघटनशील घटक असून त्याच्या वापराने पर्यावरणाचा र्हास होतो. तसेच थर्मोकोल रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्यामुळे तो रज-तमोगुणी आहे.
१. उत्सवस्थळी चित्रपटगीते, ‘रेकॉर्ड डान्स’, जुगार, मद्यपान, गुटख्यांची विज्ञापने टाळा !
२. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा !
३. रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा !