उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाचा पारा सातत्याने वर जात आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी घरोघरी व कार्यालयांतून कुलरचा वापर होत आहे.
मात्र या कुलरचा वापर करतेवेळी खबरदारी न घेतल्यास थंडावा देणारे हेच कुलर मृत्युला जवळ आणू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये कुलरमुळे शॉक लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात प्रत्येकाला एअर कंडिशन विकत घेता येत नाही. त्यामुळे बहुतांशी लोक कुलर घेण्याला पसंती देतात. यात ब्रँडेड कंपनीच्या कुलरपासून ते लोकल कारागिरांनी बनविलेल्या कुलरचा यात समावेश होतो. बँडप्रमाणेच या कुलरची क्षमता व साईजही वेगवेगळी असते.
जो तो आपल्या आवश्यकतेनुसार व आपल्या कुवतीनुसार कुलर विकत घेत असतो. बँडेड कुलर घेतल्यास कंपन्यांकडून करंट बसू नये म्हणून विशेष काळजी घेतलेली असते. मात्र लोकल कुलर लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असतात व वायरींगही साधी असते. त्यामुळे अशा कुलरमधून करंट बसण्याची शक्यता असते.
त्यामुळे कुलर लावण्यापूर्वी घरातील अर्थिग सक्षम असल्याची चाचणी अधिकृत कंत्राटदार किंवा इलेक्ट्रिशियन्कडून करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्था योग्य नसल्याने अशा घटना घडतात.
विजेचा धक्का हा जीवघेणाच असतो; पण पुरेशी खबरदारी घेतली तर विजेच्या धक्क्यामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. सर्किट ब्रेकर बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे सप्लाय बंद होतो व जीव वाचण्याची शक्यता वाढते. या उपकरणामुळे कोणत्याही अपघातावेळी वीजपुरवठा खंडित होतो.
काय काळजी घ्यावी?
■ कुलरच्या बॉडीला अर्थिग जोडलेली आहे किंवा नाही, याची खात्रा करून घ्या. कुलरची वायरिंग योग्य आणि त्रुटीमुक्त असल्याची खात्री करा.
■कुलरचा स्विच बंद करून व प्लग सॉकेटमधून बाहेर काढूनच पाणी भरावे.
■घरातील वायरींगला सर्किट ब्रेकरसारखी उपकरणे बसवावीत.
■कुलर सुरू असताना त्यात करंट येत असल्याचे लक्षात आल्यास तो त्वरित बंद करावा व अशा नादुरुस्त कुलरचा उपयोग करू नये.
■ओल्या हाताने कुलर हाताळू नये.
■कुलरमधून एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यास त्या व्यक्तीस हात लावू नये.
■ कोरड्या लाकडी काठीने त्या व्यक्तीस कुलरपासून वेगळे करावे व त्वरित वैद्यकीय उपचाराकरिता डॉक्टरकडे घेऊन जावे.
■जोड असलेल्या वायरने कुलरला वीजपुरवठा देऊ नये. अखंड वायर वापरावी.
■कुलर नेहमी एका स्वतंत्र पॉवर सॉकेटवर लावा.
■कधीही एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे चालू करू नका.
■लहान मुलांना कुलरपासून दूर ठेवा.
■पावसाळ्यात कुलर वापरणे टाळा.
■कुलरची नियमितपणे तपासणी करून दुरुस्ती करून घ्या.
■ कुलरची नियमितपणे देखभाल व दुरुस्ती करा.