कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते. विमाधारक निश्चित स्वरूपाचा प्रीमिअम ठरावीक मुदतीसाठी भरतो आणि या काळात आकस्मिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबासाठी मोठय़ा रकमेची तरतूद करतो,
असा आयुर्विम्याचा एक अतिशय सोपा प्रकार म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ होय. हा शुद्ध व निखळ स्वरूपाचा विमा प्रकार असून, अत्यंत कमी हप्त्यात, मोठय़ा रकमेचे विमा संरक्षणाचे कवच यातून मिळविता येते.
टर्म इन्शुरन्स कशासाठी?
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास माझ्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल. यामध्ये, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आदी जबाबदाऱ्यांना कवच दिले जाते.
त्यामुळे विमाधारक अर्थात घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याच्या दाव्याचा उपयोग त्याच्या अपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी केला जाईल.
तसेच, सध्याचे टर्म इन्शुरन्स योजना या आरोग्य (गंभीर आजार व अपंगत्व) आणि अपघाती मृत्यू यापासूनही संरक्षण देतात.
विमा संरक्षण विकत घेण्याचे काय फायदे आहेत?
भारतीयांची जीवनशैली बदलते आहे व यामुळे लहान वयात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. मी घरातील कमावती व्यक्ती असल्यास आणि मला गंभीर आजाराचे निदान झाल्यास माझ्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो.
गंभीर आजारापासून आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्लानमुळे, अतिरिक्त आर्थिक भार न पडता माझ्या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांचा अतिरिक्त भार न पडता त्यांची नियमित जीवनशैली कायम राखणे शक्य होईल.
सध्या, विमा कंपन्या विम्याच्या दाव्याची रक्कम नियमित उत्पन्न म्हणून मिळण्याचा पर्याय वारसांना देतात. यामुळे कुटुंबांना त्यांच्या अर्थकारणाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते.
लवकर योजना खरेदी करणे म्हणजे कमी प्रीमिअममध्ये कवच निवृत्तीपर्यंत कायम राखणे.
क्लेम सेटलमेंट रेशो : विमा कंपनीने सातत्याने क्लेम सेटलमेंट रेश्यो उच्च राखला असल्याची, तसेच विनासायास क्लेम सेटलमेंट केल्याची खात्री करा.
नॉमिनेशन : योजनेसाठी वारस ठरवा, हा वारस योजनेचा लाभार्थी असेल.
सत्यनिष्ठता : स्वत:विषयी, प्रामुख्याने वैद्यकीय माहितीबाबत सर्व खरी माहिती द्या. यामुळे क्लेम सेटलमेंट सुलभ होईल.
आरोग्यविषयक दक्षता : वैद्यकीय चाचणीतून एखादी व्याधी व आरोग्यविषयक समस्या पुढे आल्यास, विम्यासाठी अधिक प्रीमिअम भरावा लागू शकतो.
याचा अर्थ असा की, तुमच्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला आपोआपच आरोग्याबाबत अधिक सजगता व दक्षतेची गरज भासेल.