लाईफस्टाईल

चीन होणार म्हातारा ! वयोवृद्धांच्या वाढत्या संख्येचे देशापुढे मोठे आव्हान

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi news : वाढत्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे चीनने काही दशकांपूर्वी ‘एक मूल’ धोरण लागू केले होते. अलीकडेच चीनने हे धोरण मागेही घेतले; परंतु घसरलेल्या जन्मदरामुळे बसलेल्या फटक्यातून सावरणे आता चीनपुढील मोठे आव्हान बनले आहे.

आर्थिक विकासाच्या जोरावर येत्या काही वर्षांत हा देश जगातील उच्च उत्पन्न गटात दाखल होईल; परंतु त्यापूर्वी चीन हा म्हाताऱ्या लोकांचा देश झालेला असेल.

जागतिक बँकेने उच्च उत्पन्न, मध्यम उत्पन्न, अल्प उत्पन्न गटांची व्याख्या निश्चित केली आहे. त्यानुसार ज्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न १३,८४५ डॉलर्स इतके असते, तो देश उच्च उत्पन्न गटात येतो.

एकविसाव्या शतकात चीनच्या आर्थिक विकासाचा वारू चांगलाच उधळला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या विकसित देशांना मागे टाकून चीन आर्थिक पातळीवर वेगाने घोडदौड करू लागला.

चीनच्या आर्थिक विकासाचे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञदेखील कौतुक करू लागले. परंतु एवढे असूनही २०२२ साली चीनमधील दरडोई उत्पन्न १२,८५० डॉलर्सपर्यंतच पोहोचले. यामागे चीनच्या लोकसंख्येतील वयोवृद्धांचा वाढता वाटा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

सध्या चीनची १४ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे वयावरील आहे.जपानमध्ये ही स्थिती १९९३ सालीच आली होती; परंतु जपानची ६५ वर्षे वयावरील लोकसंख्या १० टक्क्यांवर पोहोचण्यास १० वर्षे लागली.

त्याउलट चीनने हा टप्पा ६ वर्षांतच ओलांडला. वयोवृद्ध लोकांच्या संख्यावाढीचा वेग पाहता येत्या दोन दशकांत चीनमधील ६५ वर्षांवरील लोकांची संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येहून अधिक होईल.

एकंदरित आर्थिक प्रगतीच्या जोरावर चीन लवकरच विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसेल; परंतु त्यापूर्वी चीन म्हाताऱ्यांचा देश झालेला असेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कार्यक्षम मनुष्यबळाच्या तुटीचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला देखील बसू शकतो.

चीनने १९८० साली ‘एक मूल धोरण लागू केले आणि २०१६ साली ते मागे घेतले. आता चीनमध्ये तीन मुले जन्माला घालण्यास परवानगी आहे. एवढेच नाही, तर दुसरे व तिसरे मूल जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला रोख अनुदान दिले जाते. नवविवाहित दाम्पत्याला पगारी रजा देखील मिळते.

आकडेवारीनुसार २०२२ साली जागतिक लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या ९.८२ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे वयावरील होती. २१०० साली हे प्रमाण २४ टक्के असेल. तर चीनमधील ६५ वर्षांवरील लोकसंख्या ८ दशकांत ४१ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली असेल.

जपानमध्ये आता ३० टक्के लोक पासष्टीपुढील आहेत. २१०० पर्यंत हा आकडा ३८ टक्के असेल. तर भारताची सध्या ७ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे वयावरील असून, ८ दशकांत हा आकडा ३० टक्के असेल.

Ahmednagarlive24 Office