Water On Moon : पृथ्वीवरील उच्च ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन्समुळे चंद्रावर पाण्याची निर्मिती होत असावी, असे चांद्रयान-१ एक मोहिमेतील रिमोट सेंसिंग डेटाच्या विश्लेषणातून शास्त्रज्ञांना आढळले आहे. भारताने २००८ साली प्रक्षेपित केलेल्या या पहिल्या चांद्रमोहिमेमुळेच चंद्रावर पाणी असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता पाण्याची निर्मिती कशी होते हेदेखील भारतीय चांद्रयानामुळेच स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील संशोधकांनी चांद्रयानाने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण केले आहे. पृथ्वीच्या प्लाझ्मा थरातील हे इलेक्ट्रॉन चंद्राच्या वातावरण प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत.खडक, खनिजांचे विभाजन, विघटन यांसाठी देखील हे इलेक्ट्रॉन कारणीभूत आहेत.
हेच इलेक्ट्रॉन संभवतः चंद्रावर पाण्याच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमी नामक नियतकालिकामध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. चंद्रावरील पाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी चांद्रयान-१ने पाठवलेली माहिती उपयुक्त आहे.
कारण भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत स्थापन केल्यानंतर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ती महत्त्वाची ठरणार आहे. २००८ साली प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-१ने चंद्रावर पाण्याच्या संशोधनाबाबत मोठी भूमिका बजावली होती. इस्रोने चांद्रयान-१ ऑक्टोबर २००८ साली प्रक्षेपित केले होते आणि ते २००९ पर्यंत कार्यरत होते. या मोहिमेत एक ऑर्बिटर आणि एक इम्पक्टरचा समावेश होता.
‘आदित्य- एल१’चा चौथा कक्षाविस्तार यशस्वी
बंगळुरू : सूर्याच्या अभ्यासासाठी झेपावलेले भारताचे पहिले सौरयान ‘आदित्य- एल१’ ने चौथा कक्षाविस्तार शुक्रवारी पार पडला. हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिण घालत असून त्याची परिभ्रमण कक्षा हळूहळू वाढवण्यात येत आहे.
चौथ्या कक्षाविस्तारानंतर हे यान आता किमान २५६ किमी तर कमाल १ लाख २१ हजार ९७३ किमी अंतरावरून परिभ्रमण करत आहे. कक्षाविस्ताराची पुढील प्रक्रिया १९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या कक्षाविस्तारासोबत सौरयान सूर्याच्या दिशेने रवाना होईल. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर सुमारे ११० दिवसांचा प्रवास करून आदित्यएल-१ लॅग्रेंज बिंदूवर पोहोचेल.
काय सांगतात शुआई ली ?
शास्त्रज्ञ शुआई ली यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी सौरवाऱ्यांमधील उच्चभारीत कण फोटॉन्स चंद्राच्या पृष्ठभागावर आदळतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या उपग्रहावर पाण्याची निर्मिती होत असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
एखादा ग्रह, उपग्रहाला सौरवाऱ्यांपासून वाचवणाऱ्या क्षेत्राला मॅग्नेटोटेल म्हणतात. मॅग्नेटोटेल वातावरण, पृष्ठभागाचे सौरवाऱ्यांपासून संरक्षण करतो. परंतु सूर्याच्या प्रकाश फोटॉनपासून नाही. पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमध्ये ज्यावेळी पाण्याची निर्मिती झाली होती, त्यावेळी चंद्र मॅग्नेटोटेलपासून बाहेर होता.