Dead bodies of aliens : विश्वाच्या या पसाऱ्यात ‘कोणी तरी आहे तेथे’ ही मानवी भावना जुनीच आहे. पृथ्वीप्रमाणेच कोठेतरी दूर एखाद्या ग्रहावर आपल्यासारखीच जीवसृष्टी असेल, एवढेच नव्हे तर आपल्याहून अधिक प्रगत संस्कृती तेथे असेल, असे मानणारा मोठा वर्ग आजही समाजात आहे.
हे परग्रहावरील प्राणी अधूनमधून पृथ्वीला भेट देत असतात, किंबहुना प्राचीन काळी या प्राण्यांची येथे वस्ती होती, यावर ठाम विश्वास असणारे लोकही आहेत. त्या सर्वांच्या त्या विश्वासावर शिक्कामोर्तब करू शकेल, अशी एक बातमी मेक्सिको सिटीतून आली असून,
तेथील संसदेत मंगळवारी वैज्ञानिकांनी चक्क दोन तथाकथित एलियन्सचे (परग्रहावरील प्राण्यांचे) मृतदेह सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पेरूतील एका खाणीत ते मृतदेह आढळले होते.
मेक्सिकोच्या संसदेत मंगळवारी एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल जोरदार चर्चा झाली. त्या वेळीच हे दोन पिटुकले ‘ममीभूत’ मृतदेह दाखवण्यात आले. मेक्सिकोतील एक पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जेमी मौसान यांनी असा दावा केला की, हे मृतदेह कुठल्याही तथाकथित यूएफओ अपघातातून सापडलेले नाहीत, तर ते एका खाणीत आढळले.
ते सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असावेत. या शवांचे रेडिओकार्बन डेटिंग कालमापन करण्यात आले असून, त्यानुसार त्यातील ३० टक्के डीएनए अनोळखी असल्याचे दिसून आले आहे.
पेरूतील खाणीत सापडलेले ते एलियन्स मानवाकृती असून, त्यांच्या हाता आणि पायाला तीन बोटे आहेत. हे दोन्ही मृतदेह एका लाकडी पेटीत ठेवण्यात आले होते. ती पेटी संसदेत उघडून दाखवण्यात आली.
त्याप्रसंगी अमेरिकेच्या नौदलाचे माजी पायलट रायन ग्रेव्जही उपस्थित होते. गेव्ज यांनी आपण एलियन्सचे यान पाहिल्याचा दावा अमेरिकेच्या संसदेत केला होता. या प्रसंगी एका तज्ज्ञाने या मृतदेहांपैकी एकाच्या आत अंडी, तसेच शरीरात अत्यंत दुर्मीळ अशा घातूचा तुकडाही आढळल्याचेही शपथपूर्वक सांगितले.
दरम्यान, ज्या जेमी मौसान यांनी हे एलियन्सचे मृतदेह सादर केले, त्यांनी काही वर्षांपूर्वी लहान मुलांचे ममीभूत मृतदेह परग्रहावरील मानवाचे म्हणून दाखवल्याचे उघड झाले होते. त्या गौप्यस्फोटामुळे आताच्या त्यांच्या या सादरीकरणाबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत