Uranus Planet : रात्रीच्या निरभ्र आकाशात ग्रह- ताऱ्यांचे निरीक्षण करणे हा एक अनोखा अनुभव असतो. विशेषतः खगोल विज्ञानामध्ये रस असणाऱ्या लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण करणे ही अत्यंत रोमांचक बाब असते.
आकाशात ग्रहांच्या अशा काही स्थिती निर्माण होत असतात की ज्या स्थितीमध्ये त्यांचे पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी निरीक्षण करता येते. खगोलप्रेमींसाठी अशा स्थिती म्हणजे जणू पर्वणीच असतात.
अशीच एक पर्वणी याच आठवड्यात आपल्याला लाभणार आहे. कारण या आठवड्यात युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील सहावा ग्रह आपल्याला डोळे भरून पाहण्याची दुर्लभ अशी संधी लाभणार आहे.
कारण या आठवड्यात युरेनस मेष नक्षत्रामधून प्रवास करत आहे. तसेच त्याचा प्रकाशही अधिक तीव्र असणार आहे. शिवाय त्यावेळी आकाशामध्ये चंद्रही नसेल, त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला डोळयांनी युरेनसचे दर्शन घेता येणार आहे.
ही स्थिती अशी आहे की ज्यामध्ये युरेनसच्या पश्चिम दिशेला गुरू ग्रह असेल तर पूर्वेकडे प्लिएडस नावाचे तारकामंडल असणार आहे. युरेनस हा ग्रह सूर्यापासून तब्बल ३.२ अब्ज किलोमीटर दूर अंतरावर आहे.
त्याचा व्यास ५१ हजार २०० किलोमीटर आहे. नासाच्या व्हॉएजर – २ युरेनसच्या जवळून जाताना मिळवलेल्या माहितीनुसार हा ग्रह आपल्या अक्षाभोवती १७.४ तासांत एक चक्कर पूर्ण करतो. आतापर्यंत युरेनसचे २७ चंद्र वैज्ञानिकांनी शोधले आहेत.
संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, युरेनस हा ग्रह आपल्या अक्षापासून ९८ अंशामध्ये झुकलेला आहे. याच कारणाने युरेनसवरील ऋतुचक्र खूपच असामान्य असते. युरेनसला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ८४ वर्षांचा कालावधी लागतो.