पर्यावरणपूरक गणेशोत्सव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.

गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले.

कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.

यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल.

• पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पण या प्रयत्नात आपण आपलाही सहभाग नोंदवूया.

• आपण आपले सगळे उत्सव आणि सण यापुढे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे व्हावे यासाठी आग्रह धरुया.

• पर्यावरणाचे रक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

• कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो.

• लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे महत्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह धरुया.

• शांततापूर्ण वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी, ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा उत्सव साजरा करुया..

• श्री गणराय म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवता. मांगल्यदेवता आणि बुद्धीदेवतेचा हा उत्सव असून या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव हा जगातील मोठा सामाजिक उत्सव बनला आहे.

• गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो. तो साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल, तसेच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.

• गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

ध्वनीक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठय़ा आवाजातील वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात.

• कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळतात. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.

इकोफ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य लागते.

• पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण स्वत:सह अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करा. गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास गणपतीचे विर्सजन केल्यानंतर या मूर्ती तत्काळ विसर्जित होतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्या.

• गणपती विसर्जित केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्य यांची होणारी दशा आपण पाहतो. यामुळेच आपला दृष्टीकोन बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वकभूमीवर “पर्यावरणपूरक गणेशोत्सवा’चा नवा मूलमंत्र आपण जपणे आवश्यक आहे.

• गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी आणि जलप्रदूषण मोठया प्रमाणावर होते. हे प्रदूषण थांबविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आली. आता विविध स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग पर्यावरणपूरकतेचा आग्रह धरतात.

ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी ढोल-ताशा पथक व स्पीकरवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. निर्माल्य व गणेशमूर्ती नदीत विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते; पण दर वर्षीप्रमाणे निर्माल्यसाठी कलश व गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रीम हौदांचा पर्यायही अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने जलप्रदूषण रोखण्यास मदत होते.

• गणेशोत्सवाच्या काळात आपले महाराष्ट्र पोलीस सतर्क असते. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा.

• पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत समाजात अजून प्रबोधन होणे आवश्यक आहे. इकोफ्रेंडली गणपतींमुळे खरोखरच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ होत आहे.

• वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे.

गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यापरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला तर मग यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करूया.

लेखिका: वर्षा फडके

अहमदनगर लाईव्ह 24