कडाक्याच्या उन्हात जीवाला थंडावा अर्थात गारवा लाभावा, यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता विविध प्रकारचे थंडगार पदार्थ व पेय बाजारात आले आहेत. मध्यम वर्गीय, श्रीमंत मावा, कुल्फी,
चोकोबार, आईस क्रीम, लस्सी यासारख्या पदार्थांना पसंती देतात; गोरगरीबांच्या वसाहती, वीट भट्टी व शेतमजुरांच्या मुलांसह ऊसतोड मजुरांची मुले आजही बर्फापासून तयार झालेल्या गारेगार व पेप्सीला पसंती देताना दिसत आहेत.
लहानपणी सायकलवर पेटी बांधून गारेगार विक्री करणाऱ्यांच्या मागे पळून गारेगारचा हट्ट धरला जायचा. वेळप्रसंगी पैसे नसतील तर घरातील जुने पुराने भंगार देऊन का होईना, उन्हाने पडलेली कोरड घालवून घशाला थंडावा देण्यासाठी धडपड केली जायची.
२० ते २५ पैशाला असणारे गारेगार मिळाले नाही, तर घरात तासन्तास रडगाणं चालायचं; मात्र गारेगार मिळवायचा हट्ट सोडला जात नसे. इतकं प्रिय असलेलं गारेगार काळाच्या ओघात लोप पावत की काय, असा प्रश्न निर्माण व्हायचा. कारण मावा कुल्फी, चोकोबार, मटका कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी असे एक ना अनेक नवीन पदार्थ पर्याय म्हणून गारेगारला उपलब्ध झाले, परंतु हे पर्याय धनाढ्य किंवा खिसा गरम असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी आहेत.
गारेगारला अशुद्ध पाण्याचा बर्फ वापरला जातो, असे कारण देत त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु आजही ऊसतोड मजुरांच्या तांड्यावर अर्थात अड्ड्यावर हातगाडी लोटत अथवा दुचाकीवर पेटीत गारेगार घेऊन येणाऱ्या विक्रेत्याला चिमुकले गराडा घालतात आणि दोन-तीन रुपयाचे गारेगार घेतात व आनंदी होतात.
वेळप्रसंगी आई-वडीलही गारेगार घेऊन घशाला गारवा देतात. बर्फ कोणताही असो; परंतु अगदी आर्थिक बजेटमध्ये मिळणारा गारेगार वीस पंचवीस रुपयात संपूर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणीत करतो. त्यामुळे सहजासहजी गारेगार घेऊन ऊसतोड मजूर बांधव मुलांना खुश करतात.
गारेगारची क्रेज आजही एका वर्गात असल्याने गारेगार विक्री करणाऱ्यांच्या गाडी अथवा दुचाकी समोर मुले व माणसं एकच गर्दी करताना दिसतात. सर्दी असो अथवा दात दुखी तरी गारेगार खाल्ले जाते; मात्र तशी प्रतिकारशक्ती सुद्धा या मुलांना परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे गारेगार खाऊनही ते ठणठणीत असतात.
गारेगारची जागा घेतली बर्फाच्या गोळ्याने
मावा, कुल्फी, चोकोबार यांना पसंती देत गारेगार नाकारणाऱ्या अनेकांना मात्र लग्नसराईत विवाहस्थळी थंडगार बर्फाच्या गोळयाचा स्वाद घेतल्याशिवाय जमत नाही. बर्फ किसून तयार केलेल्या बर्फाच्या गोळ्यावर विविध रंगाचे व चवीचे मिश्रण टाकले जाते. यावेळी अनेकांना तो खाण्याचा मोह आवरत नाही; मात्र बालपणी गारेगार खाण्याची आठवण मनोमन अनेकांना होते.