Gold News : देशातल्या ५५ नवीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा तिसरा टप्पा १६ राज्यांमधील ५५ जिल्ह्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.
मौल्यवान धातूच्या शुद्धतेचा पुरावा म्हणून हॉलमार्किंग १६ जून २०२१ पर्यंत स्वेच्छेने लागू होते. त्यानंतर टप्प्याटप्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या देशातील एकूण ३४३ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
हॉलमार्किंग हे दागिन्यांच्या शुद्धतेचे मानक आहे. सोने, चांदी आणि प्लॅटिनम सारख्या मौल्यवान धातूंच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. हलमार्किंगमुळे मौल्यवान धातूंना विश्वासार्हता प्रदान होते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरोद्वारे (बीआयएस) केले जाते. दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.
ग्राहकांना फायदा काय?
बीआयएसचा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. अनिवार्य हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना तेवढ्याच शुद्धतेचे सोने मिळणे सुनिश्चित होते. भेसळयुक्त सोन्याच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला चाप बसतो.
हॉलमार्किंगची यशस्वीपणे अंमलबजावणी
हॉलमार्किंगचा पहिला टप्पा २३ जून २०२१ रोजी सुरू झाला त्यावेळी २५६ जिल्ह्यांचा समावेश होता. दुसरा टप्पा ४ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाला त्यावेळी आणखी ३२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. आता १६ जिल्ह्यांतील नवीन ५५ जिल्ह्यांचा समावेश करून या अनिवार्य नियमाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. याची अंमलबजावणी ८ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या भारतीय मानक ब्युरोने गेल्या दोन टप्प्यांत हॉलमार्किंगची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे.
सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगच्या तिसऱ्या टण्याच्या अंमलबजावणीसाठी एक आदेश ८ सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आला असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या अनिवार्य हॉलमार्किंगच्या तिसऱ्या टप्प्यात १६ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५५ अतिरिक्त नवीन जिल्ह्यांचा समावेश असेल, असे या अध्यादेशात म्हटले आहे.
■नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या वाढली
नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या ३४,६४७ वरून १,८१,५९० पर्यंत वाढली आहे. अनिवार्य हॉलमार्किंग लागू झाल्यापासून हॉलमार्किंग केंद्रांची संख्या ९४५ वरून १,४७१ पर्यंत वाढली आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनसह दररोज चार लाखांहून अधिक सोन्याचे उत्पादन हॉलमार्क केले जात आहे.
■ या जिल्ह्यांचा समावेश
याअंतर्गत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी पाच जिल्हे, तेलंगणातील चार जिल्हे, बिहारमधील पूर्व चंपारण्यसह आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हरयाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी तीन जिल्हे, तर आसाम, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी दोन जिल्हे समाविष्ट केले जातील. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.