Gold And Silver Purity Test:- भारतामध्ये लग्नसराई आणि सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. सध्या जर आपण सोने आणि चांदीचे दर बघितले तर ते उच्चांकी पातळीवर आहेत व असे असताना देखील सोन्याच्या खरेदीमध्ये घट आल्याचे चित्र नाही.
सोने चांदीचे दर वाढले तरी देखील खरेदी ही ज्याप्रमाणे व्हायला हवी त्याप्रमाणेच झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे इतके महाग सोने किंवा चांदी घेताना आपली फसवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून देखील काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. नाहीतर उगीचच पैसा जाऊन मनस्ताप होण्याची या माध्यमातून शक्यता बळावते.
सोन्याची शुद्धता जर बघितली तर ती प्रामुख्याने हॉलमार्क पाहून केली जाते किंवा हॉलमार्क पाहूनच सोन्याची खरेदी करावे असा सल्ला देखील बऱ्याच जणांकडून दिला जातो.
परंतु आपल्याला हेच माहिती नसते की हॉलमार्क देखील बनावट असू शकतो व अशावेळी मात्र आपली फसगत होण्याची शक्यता वाढते व त्याकरिता आपण या लेखामध्ये हॉलमार्क खरा किंवा खोटा हे कसं ओळखायचे याबद्दलची माहिती बघणार आहोत.
खऱ्या हॉलमार्कची ओळख कशी कराल?
जो काही खरा म्हणजेच अस्सल हॉलमार्क असतो त्यावर बीआयएस लोगो, किती कॅरेटचे सोने आहे त्याचा क्रमांक आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच एचयुआयडी लिहिलेले असते. तुम्ही जर बीआयएस केअर ॲपवर एचयुआयडी क्रमांक टाकला तर हॉलमार्क आपल्याला तपासता येऊ शकतो.
जो अस्सल म्हणजेच मूळ हॉल मार्क असतो त्यावर कुठल्याही प्रकारचे डाग किंवा ओरखडे देखील नसतात व त्याचा रंग आणि चमक दागिन्यांशी मिळती जुळती असते. याउलट बनावट हॉलमार्क ओळखायचा असेल तर त्यावर फक्त बीआयएस लोगो आणि दुकानाचे नाव असते. परंतु याची एचयुआयडी क्रमांक त्यावर नसतो.
जरी असला तरी तो जुना झाल्या सारखा किंवा स्क्रॅच असलेला दिसतो. तसेच त्यावरील संख्या देखील स्पष्ट दिसत नाही. तुम्ही जर बनावट हॉलमार्क वर असलेला एचयुआयडी क्रमांक बीआयएस एप्लीकेशनवर टाकला तर कुठलीही माहिती किंवा तपशील मिळत नाही.
तसेच बनावट हॉलमार्कचा रंग आणि त्याची चमक ही दागिन्यांच्या रंगापेक्षा किंवा चमक पेक्षा वेगळी असू शकते.अशा प्रकारे आपण खरा किंवा बनावट हॉलमार्क ओळखू शकतो.
सोन्याची शुद्धता कशी ओळखाल?
1- सोने खरे आहे की खोटे म्हणजे शुद्ध आहे की बनावट हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हिनेगर चा वापर करू शकतात.
यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब सोन्यावर टाकावे व काही मिनिटांनी काळजीपूर्वक त्याचे निरीक्षण करावे.जर रंगात बदल झाला नाही तर सोने शुद्ध आहे असे समजावे. कारण सोने जर बनावट असेल तर व्हिनेगरच्या थेंबामुळे ते काळे पडते.
2- चुंबकाचा उपाय हा अतिशय सोपा असून सगळ्यांना माहिती असलेला उपाय आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्याजवळ तुम्ही चुंबक नेले व त्याला जर सोन्याची चिकटले नाही तर ते खरे सोने आहे असे समजावे व त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अन्य धातूची भेसळ नाही असे आपण समजू शकतो.
3- तसेच सिरॅमिक दगडावर सोन्याचे दागिने जर तुम्ही घासले व घासताना चिन्हे डाग पडू लागले तर ते सोने बनावट आहे असे समजावे. परंतु सिरॅमिक दगडावर घासल्यानंतरही दागिने सोनेरीच राहिले तर ते सोने शुद्ध आणि खरे आहे समजावे.
4- हा देखील एक सोपा उपाय असून या उपायांमध्ये तुम्ही भांड्यामध्ये पाणी भरून त्यात सोन्याचे दागिने टाकून द्यावेत. जर दागिने पाण्यात तरंगू लागले तर ते खोटे आहेत असे समजावे. यामागील प्रमुख कारण म्हणजे खरे सोने हलके जरी असले तरी ते पाण्यात बुडते.
चांदी खरे की खोटी कशी ओळखाल?
1- चांदीची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही सिरॅमिक प्लेटचा वापर करू शकता. सिरॅमिक प्लेटच्या माध्यमातून चांदीची शुद्धता ओळखण्यासाठी चांदीच्या दागिन्यांच्या कागदाने स्क्रॅच करण्याचा प्रयत्न करावा व तुम्हाला निळ्या किंवा राखाडी रंगाची रेषा दिसली तर समजून घ्या की चांदी बनावट आहे.
2- चांदीच्या तुकड्यावर जर तुम्ही ब्लिचचा एक थेंब टाकला तर खरी चांदी पटकन काळी पडते तर बनावट चांदीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.
3- सोन्याच्या चाचणी प्रमाणेच तुम्ही चांदीच्या चाचणीसाठी देखील चुंबकाचा वापर करू शकतात. चांदी जवळ जर तुम्ही चुंबक ठेवले व त्याला जर चांदी चिकटली तर ती बनावट आहे असे समजावे.