पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व आणखी किती काळ टिकून राहू शकेल, याबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. यासंदर्भात अनेक उलटसुलट दावे करण्यात आले आहेत आणि आजही केले जात आहेत.
मात्र, आजपासून सुमारे ९ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरून मानवजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. त्या काळी संपूर्ण पृथ्वीवर केवळ १ हजार २८० मानव शिल्लक होते, असा खळबळजनक दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क टाईम्स या प्रतिष्ठित वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार चीनी वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, आजपासून सुमारे ९ लाख ३० हजार वर्षांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, त्या वेळी मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले होते.
चीनी वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, ९ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर केवळ ९८ हजार मानव होते. त्यानंतर हवामानात असा काही बदल झाला की त्यामुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले.
या स्थितीला वैज्ञानिकांनी ‘बॉटलनेक’ असे नाव दिले आहे. बॉटलनेक ही स्थिती पृथ्वीवर सुमारे १ लाख १७ हजार वर्षे कायम राहिली होती. या कालावधीत बहुतांश लोक मरण पावल्याने पृथ्वीवर केवळ १ हजार २८० लोक जिवंत राहिले होते.
‘सायन्स जर्नल’ या नियतकालिकामध्येही बॉटलनेकसंबंधी एक शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार बॉटलनेक कालावधीत पृथ्वीवरील मानवजात नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर मानवाची संख्या झपाट्याने वाढली. आज पृथ्वीवर सुमारे आठ अब्ज मानव आहेत.