संध्याकाळी ६ वाजेनंतर जड जेवण घेण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
वृत्तसंस्था : न्यूयॉर्क संध्याकाळी सहा वाजेनंतर जड जेवण करणे महिलांच्या हृदयांसाठी घातक असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे १६ ते १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वैज्ञानिक परिषदेत याबाबतचे संशोधन सादर केले जाणार आहे.
सरासरी वय ३३ वर्षे असलेल्या ११२ महिलांवर हे संशोधन करण्यात आले आहे. या महिलांवर वर्षभर संशोधन करण्यात आले असून त्या महिलांचा रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्टेरॉल याबाबत लक्ष ठेवण्यात आले. वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षअखेर आकडे एकत्र करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या परिमाणांचा वापर केला. धूम्रपान न करणे, शारीरिकरीत्या सक्रिय राहणे, सकस अन्नाचे सेवन आणि वजन नियंत्रित ठेवणे यासारख्या उपायांनी यावर मात करता येते असे या संशोधकांनी म्हटले आहे.
आतापर्यंत, हृदयरोग रोखण्यासाठी आपण काय खातो आणि किती खातो यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे कोलंबिया विद्यापीठातील नॉर मकरेम यांनी म्हटले आहे.
या प्राथमिक निष्कर्षातून संध्याकाळच्या वेळेस कॅलरींचे प्रमाण लक्षात ठेवून हेतूपूर्वक केलेले खाणे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करण्याची सोपी पद्धत असल्याचेही नॉर मकरेम यांनी म्हटले आहे.
अधिक लोकांना सहभागी करून घेत संशोधन करत यावर शिक्कामाेर्तब करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या संशोधनात सहभागी झालेल्यांनी इलेक्ट्राॅनिक फूड डायरीचा वापर केला.
अहमदनगर लाईव्ह 24