Ajab Gajab News : ह्या ठिकाणी माणूस आणि बिबटे एकमेकांच्या सहवासात गुण्यागोविंदाने राहतात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : बिबट्या हा वाघाच्या कुळातील सर्वात धोकादायक शिकारी प्राणी. असे सांगितले जाते की बिबट्या भूक लागलेली नसेल तेव्हाही भक्ष्यावर जीवघेणा हल्ला करतो. मानवी वस्तीच्या आसपास असलेल्या जंगलातील बिबटे चक्क माणसांचीदेखील शिकार करायला मागे-पुढे पाहात नाहीत.

पण आपल्याच देशात असे एक ठिकाण आहे की जिथे माणूस आणि बिबटे एकमेकांच्या सहवासात गुण्यागोविंदाने राहतात.हे ठिकाण म्हणजे राजस्थानमधील एक दशक्रोशी आहे.

म्हणजे या परिसरातील जवळपास दहा गावांमध्ये मानव आणि बिबटे एकमेकांच्या सहवासात राहतात. ना माणूस बिबट्यांची शिकार करतो, ना बिबटे माणसांवर हल्ला करतात. आहे ना आश्चर्याची गोष्ट ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार मागील सुमारे शंभर वर्षांमध्ये या दहा गावांमध्ये बिबटे आणि माणूस यांच्यातील हा ‘भाईचारा’ अबाधित राहिला आहे. या शंभर वर्षांत या दहा गावांमध्ये कोणीही कधीही बिबट्याची शिकार केलेली नाही. त्याचप्रमाणे बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे कधी कधी येथील बिबटे शेतकऱ्यांच्या पाळीव गायी-गुरांवर ताव मारतात. पण गावकरी त्याला देवाची इच्छा समजून बिबट्यांना माफ करतात. या दशक्रोशीमध्ये राहणारे बहुसंख्य लोक हे रबाडी जमातीचे आहेत.

पशुपालन हा त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. या गावांमधील लोकांना बिबट्यांच्या सान्निध्यात राहण्याची एवढी सवय होऊन गेली आहे की गावातील लहान मुले देखील बिबट्या दिसला तर मुळीच घाबरत नाहीत. बिबटेदेखील त्यांच्यावर मुळीच हल्ला करत नाहीत.