कमी झोप घेणारे असतात जास्त आशावादी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

न्यूयॉर्क : एखाद्या व्यक्तीची झोप कमी वा जास्त असण्याचा थेट संबंध आनुवंशिकतेशी असू शकतो, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. एडीआरबी१ नामक जनुकाचा मनुष्याच्या झोपेच्या कालावधीशी संबंध असतो.

कमी झोप घेणाऱ्या माणसांची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी फारसी माहिती आलेली नाही. मात्र एका अध्ययनानुसार, कमी झोप घेणारे बहुतांश लोक आशावादी आणि उत्साही असतात. ते तणाव व वेदना सहज सहन करतात.

६३ वर्षांच्या ब्रेड जॉन्सन यांना कधी सहा तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याचे आठवत नाही. ते अलार्मशिवाय उठतात. दिवसभर उत्साही असतात. १५ वर्षांपूर्वी त्यांनी शास्त्रज्ञांसमोर हा विषय मांडला. त्यांनी तपासण्यांतून असा निष्कर्ष काढला की, जॉन्सन यांच्या कुटुंबातील सहा व्यक्ती सुमारे सहा तासांपेक्षा कमी झोपतात.

चांगल्या आरोग्यासाठी साधारणपणे आठ तास झोप आवश्यक असते, पण ज्या व्यक्तींमध्ये कमी झोपेची गुणसूत्रे असतात त्यांची झोपच मुळात कमी असते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोलॉजिस्ट लुई पटेसेक यांनी एडीआरबी १ या जनुकाचा शोध लावला असून तो जॉन्सन यांच्या कुटुंबीयांमध्ये आढळून आला.

प्रयोगशाळेत उंदरामध्ये हे गुणसूत्र टाकले असता तो इतर उंदरांच्या तुलनेत एक तास कमी झोपला. झोपेसंबंधी आजार असलेल्या व्यक्तींसाठी हे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरू शकते.

अहमदनगर लाईव्ह 24