लंडन : आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. खराब दिनचर्येमुळे लोकांना विविध प्रकारचे आजार विळख्यात घेत असल्याचे डॉक्टरही सांगत आहेत. मात्र हे कुणीच फारसे मनावर घेत नाही.
आता एका ताज्या अध्ययनातून काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या तुम्हाला आपल्या जीवनशैलीत बदल करणे भागच पडेल. या अध्ययनानुसार, समजा तुम्ही सतत सुस्तावलेले जीवन जगत असाल तर अल्पवयातच तुमच्या मृत्यूचा धोका दुप्पटीपर्यंत वाढतो.
नॉर्वेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनानुसार, कोणत्याही प्रकारचे आरोग्य लाभ, त्यात ह्रदय व अन्य आजारांपासून बचाव यांचा समावेश आहे. त्यासाठी व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे गरजेचे असते.
शारीरिक हालचालींंमध्ये बदल केल्यानंतर २२ वर्षे तशाच प्रकारचे आयुष्य जगत असलेल्या व्यक्तीचे ह्रदयाचे आजार व अन्य कारणांमुळे कसा मृत्यू होऊ शकतो, हे जाणून घेण्याच्या हेतूने हे अध्ययन करण्यात आले. त्यात १९८४-१९८६, १९९५-१९९७ आणि २००६-२००८ दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश केला.
त्यांच्याकडून ते किती वेळ शारीरिक हालचालींमध्ये सहभागी असतात, हे जाणून घेण्यात आले. या अध्ययनात सहभागी केलेल्या २३ हजार १४६ पुरुष व महिलांचे अजिबात शारीरिक हालचाली न करणे, सामान्य, आठवड्यातून दोन तासांपेक्षा कमी व जास्त आणि आठवड्यातून दोन वेळा वा त्याहून जास्त असे वर्गिकरण करण्यात आले.
सुस्त आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूचा धोका होता व ह्रदयाच्या आजारामुळे मृत्यूचा धोका अडीचपट जास्त होता, असे त्यात दिसून आले.