मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी व तिथे मानवी वसाहत वसविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन आणि अन्नाच्या पर्यायांसंबंधी शोध घेतला जात आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या दिशेने केलेल्या अध्ययनात असे म्हटले आहे की, मंगळावर कीडे अन्नाच सर्वोत्तम स्रोत असू शकतो.
याशिवाय प्रयोगशाळेत बनलेले मांस व दूग्धोत्पादनेही पर्याय ठरू शकतात. शास्त्रज्ञांनी पिठात तयार होणाऱ्या किड्यांबाबत माहिती दिली असून ते खाल्ले जाऊ शकतात. एका अंदाजानुसार, मंगळ ग्रहावर सौर ऊर्जा, बर्फ आणि कार्बन डायॉक्साइड आहे.
त्यापासून पाणी व ऑक्सिजन तयार केला जाऊ शकतो. तरीही तिथे अन्नाचा मुख्य स्रोत तयार करण्यात जास्त वेळ लागेल. फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी एक योजना तयार केली असून तिच्यात दहा लाख लोकांची वसाहत वसविली जाऊ शकेल.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मंगळावर लगेच भोजन बनविणे सर्वात अवघड काम आहे व समजा एखाद्याला तिथे कायमस्वरुपी राहण्याची इच्छा असेल तर तो अन्य ठिकाणाहून भोजन आयात करू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर पैदास होणारे किडे जेवणाची समस्या सोपी करू शकतात.
मंगळावर कीट फार्म तयार केले तर त्याद्वारे खाण्याच्या गरजा भागविल्या जाऊ शकतात.
कारण किडे कमी पाण्यातही जिवंत राहू शकतात व ते कॅलरीचा सर्वोत्तम स्रोत आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्पेसएक्ससारख्या धनाढ्य कंपन्यांनी मंगळावर मानवी वसाहत वसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांची तिथे आगामी ५० ते ७० वर्षांत एक संपूर्ण संस्कृती विकसित करण्याची इच्छा आहे.