लंडन : एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या आर्थिक कुवतीनुसार त्याला वेतन देते. पगारवाढही कंपनीच्या हिशेबानेच होते. मात्र कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मनाने पगार ठरविण्याची व वाढविण्याची संधी देणाऱ्या कंपनीबाबत तुम्ही कधी ऐकले आहे का?
नसेल तर लंडनमध्ये अशी एक कंपनी आहे. तिथे काम करणारे कर्मचारी स्वत:च आपला पगार निश्चित करतात व मनाला वाटेल तेव्हा वाढवूनही घेतात. ग्रांटट्री असे या कंपनीचे नाव असून ती इतर कंपन्यांना सरकारी निधी मिळवून देण्याचे काम करते. या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने स्वत:च तिचा पगार वाढवून घेतला.
पूर्वी तिचा पगार २७ लाख रुपये होता. आता तिने तो ३३ लाख करून घेतला आहे. सिसिलिया मंडुका नावाच्या या २५ वर्षीय महिलेने आपल्या पगारात वार्षिक ६ लाख रुपयांची वाढ केली आहे. याबाबत तिच्या मनात अनेक प्रश्न होते. मात्र तिचे असे मत होते की, तिच्या कामात आता मोठे बदल झाले असून ती ठरवून दिलेल्या टार्गेटच्याही फार पुढे निघून गेली आहे.
त्यामुळे तिने पगार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रांटट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पगार वाढविण्याआधी सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागते. या कंपनीत ४५ कर्मचारी कमा करतात आणि सर्वच कर्मचारी स्वत:चा पगार स्वत: ठरवतात.
एवढेच नाही तर त्यांना हवे तेव्हा त्यात बदल करून घेतात. मात्र पगार वाढविण्याआाधी त्याच कामासाठी अन्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो, याचीही माहिती ते घेतात. यासोबतच आपल्या कामानुसार त्यांना किती वेतन कंपनीकडून घ्यायला हवा, याचाही विचार ते करतात.