एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं. परंतु यात एखादा धोका असा असतो कि, एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर ताप तपासणाऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होण्याचा धोका असतो. परंतु शास्त्रज्ञांनी आता यावरही उपाय शोधला आहे.
आता केवळ चेहरा पाहून ताप आहे किंवा नाही हे समजणार आहे. रोपर आयआयटीच्या इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम तयार केलं आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्ती स्वत:चा चेहरा स्कॅन करेल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवर ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजण्यास मदत होणार आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितलं, हे उपकरण वापरायला छोटं, सुरक्षित असून कोणत्याही व्यक्तीशिवाय तपासणी करण्यास सक्षम आहे. इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम 160×120 पिक्सेल रेजोल्युशनसह विविध प्रकारचं तापमान मोजतो.
आयआयटी रोपरमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील असोसिएट प्रोफेसर रवीबाबू मूलवीशला यांनी सांगितलं, “एखाद्या व्यक्तीमध्ये ताप किंवा सर्दी अशी कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत का? तसंच ती व्यक्ती कोरोना संशयित आहे
की निरोगी आहे हे ओळखण्यासाठी हे उपकरण मदत करेल. मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकांची तपासणी करण्यासाठी हे उपकरण खूप फायदेशीर ठरेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.