MSEB Electricity Bill : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीने भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंतच रोखीने वीजबिल भरता येणार आहे. यापेक्षा जास्त बिल भरायचे असल्यास ऑनलाइनचा पर्याय अनिवार्य आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्चला दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्टपासून महावितरणच्या रोखीने वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आली आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येणार आहे.
तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार रुपये एवढी राहणार आहे.
ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, या पध्दतीस रिझर्व बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७च्या तरतुदी लागू आहेत. सद्यस्थितीत महावितरणचे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत असून, यातून दरमहा महावितरणला साधारणत: २,२५० कोटी महसुलाची वसुली होते.
महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस व एनईएफटीद्वारे देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
क्रेडिट कार्डवगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निःशुल्क आहे, तसेच ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये सवलत देण्यात आली आहे.
महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो. ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट / डेबिटकार्ड, नेटबँकिंग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंटमार्फतही वीजबिल भरणा करता येऊ शकतो.