अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्ही आमलेट बनवत असाल तर चवीत बदल म्हणून आमलेटला ट्विस्ट देता येईल. मस्तपैकी मसाला आमलेट बनवून बघा. या आमलेटची चव तुमच्या जीभेवर नक्कीच रेंगाळेल.
चार अंडी, प्रत्येकी एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट. एक चमचा लाल तिखट आणि हळद. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि हिरवी मिरची, तीन चमचे तेल, मीठ, मिरपूड, कोथिंबीर आणि कांदापात.
एका भांड्यात चार अंडी फोडून नीट फेटून घ्या. यात मीठ आणि मिरपूड घाला. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात आलं आणि लसूण पेस्ट घालून परतून घ्या. मग यात कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून परता.
यानंतर त्यात लाल तिखट आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा. आता तव्यावर थोडं तेल घाला. गरम झाल्यावर त्यावर फेटलेली अंडी घाला.
त्यात कोथिंबीर आणि कांदापात घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. यानंतर आमलेटवर भाज्यांचं मिश्रण पसरून घ्या. आमलेट दुमडून घ्या. ब्रेड आणि सॉससोबत खा.