लाईफस्टाईल

MPSC मार्फत तहसीलदार होण्याचे स्वप्नं पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi news : दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरतीबाबत काढलेल्या जाहिरातीची चौकशी करून ही जाहिरात रद्द करणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमिवर जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार असल्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवसांपूर्वी काढली होती.

एकीकडे आधीच कंत्राटी पद्धतीने पद भरती करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अशातच आता जळगाव जिल्ह्यात तहसीलदारसारख्या जबाबदार पदाची भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याची जाहिरात आल्याने या संतापात आणखी भर पडली होती.

याबाबत मंत्री विखे यांना पत्रकारांनी विचारले असता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदाची भरती करण्याचा निर्णय रद्द करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच याबाबत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविणार असल्याचे ते म्हणाले.

मंत्री विखे यांनी कंत्राटी तहसीलदार भरतीचा निर्णय रद्द केल्याने एम.पी.एस.सी. मार्फत तहसीलदार होण्याचे स्वप्नं पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांना तुर्त दिलासा मिळाला आहे. तसेच कंत्राटी भरतीवरून राज्यभर उसळलेल्या संतापाची लाट काही अंशी कमी होऊ शकते.’

Ahmednagarlive24 Office