अमेरिकेच्या डेट्रॉईटमधील मायामी विमानतळावर एक वेगळाच किस्सा सध्या चर्चेत आहे. विमानात बसलेल्या एका दाम्पत्याच्या अंगाला घामाची दुर्गंधी येते, अशी तक्रारी काही सहप्रवाशांनी विमानातील कर्मचाऱ्यांकडे केली होती. त्यावरून कर्मचाऱ्यांनी त्या दाम्पत्याला त्यांच्या लहान बाळासह विमानातून खाली उतरवले.
योस्सी अॅडलर आणि जेनी अशी या दोघांची नावे आहेत. हे दाम्पत्य ज्यू धर्मिय आहेत. आपण ज्यू धर्मिय असल्यामुळेच आपल्याला अशी भेदभावपूर्वक आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली, असा आरोप या दाम्पत्याने केल्याने या घटनेला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली होती.
योस्सी अॅडलर हे पेशाने व्यवसाय सल्लागार आहेत. हे दाम्पत्य बुधवारी आपल्या बाळासह मायामीवरून डेट्रॉईटला जात होते. हे विमान अमेरिकन एअरलाईन्सचे होते. विमानात बसल्यानंतर काही प्रवाशांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली होती.
या प्रकाराने संतापलेल्या योस्सीच्या पत्नीने विमानतळावर काही लोकांच्या जवळ जाऊन आपल्या अंगाला दुर्गंधी येते का, असे विचारून पाहिले. मात्र, त्या साऱ्या जणांनी असे काही नसल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी दाम्पत्याला विमानातून उतरवले खरे मात्र त्यांचे सामान विमानातच राहिले होते.
हे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून अमेरिकन एअरलाईन्सच्या व्यवस्थापनाने धावपळ सुरू केली. त्यांनी या दाम्पत्यासाठी हॉटेलमध्ये एक रुम बूक करून एक दिवस तिथे राहण्याची विनंती केली.
तसेच त्यांचे सामान परत मिळेल, अशी ग्वाही दिली. दाम्पत्यासाठी दुसऱ्या दिवशीची विमानाची तिकिटेही व्यवस्थापनाने बूक करून दिली. दाम्पत्याने समजूतदारपणा दाखवला आणि प्रकरण थोडक्यात मिटले.