Denomination Banknotes : दोन हजार रुपयाच्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विमा पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त प्रादेशिक कार्यालयांना पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी हा एक सुलभ पर्याय ठरणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँक लोकांना त्यांच्या बँक खात्यात दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी टीएलआर (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) अर्ज देणार आहे.
आम्ही ग्राहकांना सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित रीतीने त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी विमा उतरवलेल्या टपालाद्वारे रिझर्व्ह बँकेकडे दोन हजाराच्या नोटा पाठवण्याची सुविधा देत आहोत. यामुळे लोकांचा नियुक्त शाखांमध्ये जाण्याचा आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल.
टीएलआर आणि विमा पोस्ट दोन्ही पर्याय अत्यंत सुरक्षित आहेत आणि या पयार्यांबद्दल लोकांच्या मनात कोणतीही भीती नसावी. एकट्या दिल्ली कार्यालयाला आतापर्यंत सुमारे ७०० टीएलआर अर्ज मिळाले आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक रोहित पी यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक आपल्या कार्यालयात एक्स्चेंज सुविधेव्यतिरिक्त या दोन पयार्यांचा पुन्हा समावेश करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी दोन हजाराच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली.
१९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९७ टक्क्यांपेक्षा जास्त नोटा आता परत आल्या आहेत. या नोटा बदलून देण्याची किंवा बँक खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत पूर्वी ३० सप्टेंबर होती. नंतर ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. बँकेच्या शाखांमधील ठेव आणि विनिमय सेवा या दोन्ही सेवा ७ ऑक्टोबर रोजी बंद होत्या.
लोकांना ८ ऑक्टोबरपासून एकतर चलनाची बदलून घेण्याचा किंवा त्यांच्या बँक खात्यांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये समतुल्य रक्कम जमा करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे.
बँक नोटा जमा/बदली करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम या कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.